शुक्रवार, ७ डिसेंबर, २०१८

बाय...

बाय आमची...
-------विनम्र अभिवादन--------

   काही माणसं आपल्या आयुष्यात
आपली असतात ते आपलं नशिब थोर म्हणूनच.

नवरा, मुलगा,६ लेकी,जावई,सुना,४ भाऊ,भावजया,लेकी-सुनांची मिळून आम्ही २१ नातवंडे, आमच्या मुलांची मुलं म्हणजे ११ परतुडांची पणजी अशी आमची बाय.
तिची एक मैत्रीण पण होती जिवाभावाची.
नणंद तिची...
एकमेकींशी बहिणी सारख्या वागायच्या.

प्रत्येकाच्या डोळ्यांत ओल असते बायची आठवण आली की.
काहींच्या डोळ्यात ती दिसते,काही जण दाखवू शकत नाहीत.

प्रत्येकावर जीव तिचा.
घरात म्हशी,शेळ्या,कोंबड्या केवढा पसारा होता तिचा.
शेती,भलंमोठं घर...
हो हा सारा फक्त तिचाच.
तिच्यामुळेच.

वर्षातून एखाद-दोन वेळा भेट व्हायची लहान असताना.
पण वर्षभर पुरेल एवढी माया वाटायची साऱ्यांना.
लेकी सासरी जायला लागल्या की पिठापासून मिठापर्यंत सगळं द्यायची.

  गोरीपान,उंचपुरी,सडसडीत बांधा,नववारी लुगडं-चोळी,भलं मोठं कुंकू,हातात काकणं लय देखणं रूप आमच्या बायचं.
डोक्यावरला पदर ढळला नाही कधी.
शेवटी शेवटी पदर डोक्यावर रहायचा नाही,त्राण नसायचा अंगात.
तिची मात्र धडपड पदर सावरायची.

  आम्ही सारी लेकरं जमलो की लहान होऊन खेळायची आमच्या सोबत.
प्रत्येकाचं न थकता मुकं घेणार.
कौतुक करणार.
खायला घालणार.

आजोबा आमचे दादा ओरडायचे आमचा कालवा ऐकून पण ही लगेच बोलायची.
"वरडा रं,
तुमाला तरास व्हतुय तर या फिरुन वाईच भायरणं."
दादा गप लगीच.
दोघांच्यात मयंदाळा जिव्हाळा...
एकमेकांसाठी आणि बाकीच्यांसाठी पण.
एक असायची नेहमी,दोघं.
ही दोन अडाणी माणसं एवढा सारा पसारा सांभाळायचे.

  दादा कधी कधी पिऊन यायचे.
आजूबाजूची पिलेली माणसं बायकास्नी मारझोड करायचे शिवीगाळ करायचे.
पण आमच्या घरात उलट होतं.
दादांनाचा बाय फैलावर घ्यायची.
दादा उगच लाडात येत म्हणायचे,"न्हाय लय,वायच घोटभर च घितली."
गप जेवण करून दादा घोंगडीत शिरून झोपायचे.

  शेवटी शेवटी आजारपणानं कमजोर झाली व्हती.
दम्याचा त्रास दुसरं काही नाही.
आयुष्यात कधी पथ्य पाणी पाळली नाहीत.
कधी चष्मा नाही लागला,
नाहीतर कधी दात दुखला.
खाऊन-पिऊन ठणठणीत असायची.
मनाप्रमाणे जगली.,मनमुराद.

  शेवटपर्यंत घरातलं करायची,रानात जायची,शेरडं सांभाळायची.
टीव्ही चं तर भलत याड रातभर म्हणलं तरी कटाळा नसायचा टिव्ही चा.

  आयुषवर लय जीव.
राणी म्हणायची त्याला.
बाकीच्यांना राघू म्हणून हाका मारायची.
मी आलेलो दिसलो की म्हणायची,"आला बया माझा डाक्टर."

शेवटी शेवटी तब्बेत खुपच खालावली होती.
हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं.
मी मुंबईवरून गेलो पोरांना घेऊन.
आयसीयु च्या बेडवर झोपलेली.
ऑक्सिजन लावलेला.
मला म्हणाली ,"दादा मला आपलं घरी घेऊन चल,घरीच बरी व्हईन मी."
सारा गोतावळा दवाखान्यात जमलेला तिच्यासाठी.
तिचं भाऊ,भावजया,मुलगा-सुना, लेकी-जावई,नातवंडे, परतुंड काय जादू असते ना एखाद्याच्या मायेत...
घट्ट बांधून ठेवलेली सारी नाती तिने.
अभाळाएव्हढा जीव साऱ्यांवर.

आयसीयु त होती आणि बाहेर अपुर्व पडला आणि लागला रडायला.
शंभरी जवळ पोचलेली आमची बाय तिच्याजवळ असलेल्या मोठ्या लेकीला आमच्या अक्काला(मावशी) म्हणाली,"आगं कमा भाईर पोरगं पडलं का काय बग, रडतंय."

  कसं माहिती नाही पण प्रत्येकावर तिचं लक्ष.
अडाणी बाय आमची कुठून शिकली हे सगळं काय माहिती.
दवाखान्यातून घरी आणताना माझ्या शेजारी बसलेली.
अंगात ताकद अजिबात नव्हती,आवाज निघायचा नाही तोंडातून.
तशात राणूला (आयुष) मांडीवर घेऊन म्हणाली ,"माझ्या राणीचा बडे झाल्याबिगार म्या जात न्हाय."
साऱ्यांचं डोळं पाणावलं आपोआप.

  आयुषचा बड्डे होता ११.११.२०११ ला हिच्या अंगात जीव नव्हता तरी ओवाळलं तिनं.
आणि बरोबर आठवड्यातच १७.११.२०११ ला आम्हाला साऱ्यांना मागं सोडून म्होरच्या वाटंला लागली.
परत न येण्यासाठी.

खूप आठवणी आहेत न संपणाऱ्या,
मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या,
कधीच न विसरणाऱ्या...

ऐकू येतो नेहमीच तिचा आवाज.
प्रत्येकाच्या डोक्यावर अजूनही तिचा हात.
प्रत्येकाच्या स्वप्नात नेहमीचीच तिची भेट.
न पुसणारी तिची आठवण.
नित्याचीच.

- लालसिंग सुमन महिपत वैराट.
११ नोव्हेंबर २०१७.

बाय...

बाय आमची... -------विनम्र अभिवादन--------    काही माणसं आपल्या आयुष्यात आपली असतात ते आपलं नशिब थोर म्हणूनच. नवरा, मुलगा,६ लेकी,जावई,...